
खानापूर येथे रात्रीत दोन कृषीपंपांची चोरी; हवेली पोलीसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ; शेतकरी हतबल
खानापूर येथे रात्रीत दोन कृषीपंपांची चोरी; हवेली पोलीसांकडून तक्रार दाखल करुन घेण्यास टाळाटाळ; शेतकरी हतबल
खानापूर: खानापूर(ता. हवेली) येथील दोन शेतकऱ्यांचे कृषीपंप अज्ञात भुरट्या चोरांनी चोरुन नेले आहेत. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी संबंधित शेतकरी हवेली पोलीस ठाण्यात गेले होते मात्र उडवाउडवीची उत्तरे देऊन पोलीसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत.
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोड्या, चोऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. सातत्याने अशा घटना घडत असून नागरिकांचा लाखो रुपयांचा ऐवज चोरीला जात आहे. हवेली पोलीस मात्र चोरांना शोधने तर दूरच परंतु गस्त वाढवून अशा घटनांना प्रतिबंध करण्यात अपयशी ठरत आहेत. धक्कादायक म्हणजे चोरीच्या तक्रारी दाखल करुन घेण्यासाठी नागरिकांना थेट पोलिस अधीक्षकांकडे हेलपाटे मारावे लागत आहेत.
आता कृषीपंप चोरीला गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे कृषीपंप चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यासाठी हवेली पोलीस ठाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांकडे पावत्यांची मागणी करण्यात येत आहे. अनेक वर्षांपूर्वी बसविलेल्या पंपांची पावती पोलिसांना कशी आणि कोठून आणून द्यायची? असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. अगोदरच चोरट्यांना शोधण्यात अपयशी ठरलेल्या हवेली पोलीसांनी आता तक्रारच दाखल न करुन घेण्यासाठी ‘निंजा टेक्निक’ शोधून काढली आहे.