
Guillain-Barré syndrome: गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या साथीबाबत पालिका आयुक्तांना निवेदन; उपचारांचा खर्च देण्याबरोबरच तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी
Guillain-Barré syndrome: गुइलेन बॅरी सिंड्रोमच्या साथीबाबत पालिका आयुक्तांना निवेदन; उपचारांचा खर्च देण्याबरोबरच तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी
सिंहगड रोड : सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या अंतर्गत नव्याने समाविष्ट झालेल्या खडकवासला, नांदेड, किरकटवाडी , नांदोशी , सणसनगर व धायरी या परिसरात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोम या आजाराची लक्षणे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. धक्कादायक म्हणजे सर्व वयोगटातील व्यक्तींना या आजाराचा धोका असून दुषित पाण्यामुळे हा आजार पसरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे पालिकेने याबाबत तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन या आजाराची लागन झालेल्या रुग्णांच्या उपचारांचा पूर्ण खर्च पालिकेने करावा या मागण्यांचे निवेदन खडकवासला गावचे माजी सरपंच सौरभ मते यांनी पालिकेला दिले आहे.
खडकवासला, किरकटवाडी, नांदेड, धायरी व नांदोशी, सणसनगर या भागातील बहुसंख्य नागरिकांना पोट दुखणे, मळमळ, अर्धांगवायु, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसून येत आहेत. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांच्या तपासणीनंतर ही Guillain-Barré syndrome या दुर्मिळ आजाराची लक्षणे असल्याचे निदान झाले आहे. याच परिसरात हा आजार आढळून आल्याने व दिवसेंदिवस रुग्ण वाढत असल्याने पालिकेने याबाबत गांभीर्याने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
याबाबत माजी सरपंच सौरभ मते यांनी पालिका आयुक्त राजेंद्र भोसले व खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भिमराव तापकीर यांना निवेदन दिले आहे. पाणी पुरवठा विहिर, सर्व गावांतील पाण्याच्या टाक्या यांची स्वच्छता करण्यात यावी, आजाराची साथ संपेपर्यंत मोफत टॅंकरने स्वच्छ पाण्याचा पुरवठा करण्यात यावा, जनजागृती करावी, रुग्णांच्या उपचारांचा पूर्ण खर्च पालिकेने करावा अशा मागण्या सदर निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते राहुल पोकळे आदी उपस्थित होते.