
पालिकेच्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा सावळागोंधळ; शिव रस्त्याचे काम ‘जैसे थे’ तक्रार मात्र ‘Resolved’
पालिकेच्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा सावळागोंधळ; शिव रस्त्याचे काम ‘जैसे थे’ तक्रार मात्र ‘Resolved’
किरकटवाडी: नागरिकांच्या तक्रारी जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी पुणे मनपा ने सुरु केलेल्या ऑनलाईन तक्रार निवारण प्रणालीचा सावळागोंधळ चव्हाट्यावर आला आहे. खडकवासला व किरकटवाडी या गावांच्या शीव रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रखडल्याने नागरिकाने तक्रार दाखल केल्यानंतर त्यावर कोणतीही कारवाई न करता तक्रार ‘resolved’असा शेरा मारण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारदाराने पालिकेच्या कारभाराबाबत संताप व्यक्त केला आहे.
शिवनगर येथील रहिवासी शैलेंद्र मते यांनी रस्त्याचे काम अर्धवट असल्याबाबत व कामाची गती अत्यंत संथ असल्याबाबत तक्रार दाखल केली होती. काही दिवसांनी त्यांनी तक्रारीची स्थिती तपासली असता त्यांना धक्का बसला कारण प्रत्यक्षात तक्रार दाखल केल्यानंतर कोणतेही काम झालेले नसताना ‘Resolved‘ असा शेरा मारुन पालिकेने तक्रार बंद केली आहे.
करोडो रुपये निधी मंजूर असताना शिव रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. सध्या अर्धाच रस्ता उपलब्ध असल्याने सकाळ – संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या भागातील रहिवासी हैराण झाले आहेत. अशातच पालिकेची ऑनलाईन तक्रार प्रणाली नागरिकांची चेष्टा करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ज्या अधिकाऱ्याने ‘Resolved‘ असा शेरा मारुन तक्रार बंद केली त्या अधिकाऱ्यावर पालिकेने कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.