
सिंहगड रोड पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची तडकाफडकी बदली; पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश; ‘ते प्रकरण’ भोवल्याची चर्चा
पुणे: सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांची काल तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक(गुन्हे) दौलत दाईगडे यांची सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे तर पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांना नियंत्रण कक्षास संलग्न करण्यात आले आहे. काल उशिरा पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने उलटसुलट चर्चा सुरू असून नऱ्हे येथील सार्थक नेताजी भगत या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात झालेले ‘राजकारण’ भोवल्याचे बोलले जात आहे. सुरुवातीला सार्थक भगत जखमी असताना या प्रकरणातून भाजपा पदाधिकारी व नऱ्हे गावचे माजी उपसरपंच सुशांत कुटे यांचे नाव वगळण्यासाठी भाजपा आमदार ते थेट केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष घातले होते. दरम्यान उपचारांदरम्यान सार्थकचा मृत्यू झाल्याने व तो मनसे पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याने मनसेच्या नेत्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
हे सर्व प्रकरण पुणे शहर पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचले होते. आयुक्तांनी कठोर भूमिका घेत सर्व दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अगोदर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा व नंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तपास पथकातील एका अधिकाऱ्याकडे वीस लाखाची ‘डील’ झाल्याची चर्चाही सुरू होती. अद्याप त्या अधिकाऱ्यावर मात्र कारवाई करण्यात आलेली नसून पोलीस निरीक्षकांची मात्र तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई होते तेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.