Breaking News:चोरीचा आरोप खोटा, भाजपा पदाधिकारी असलेल्या आरोपीला वाचविण्यासाठी खडकवासल्याचे आमदार पाऊण तास पोलीस स्टेशनमध्ये, केंद्रीय मंत्र्यांकडूनही पोलीसांवर दबाव, तपास पथकाच्या एका अधिकाऱ्याने वीस लाखही मागितले; नऱ्हे येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांचे गंभीर आरोप
Breaking News:चोरीचा आरोप खोटा, भाजपा पदाधिकारी असलेल्या आरोपीला वाचविण्यासाठी खडकवासल्याचे आमदार पाऊण तास पोलीस स्टेशनमध्ये, केंद्रीय मंत्र्यांकडूनही पोलीसांवर दबाव, तपास पथकाच्या एका अधिकाऱ्याने वीस लाखही मागितले; नऱ्हे येथील तरुणाच्या मृत्यू प्रकरणात मनसे पदाधिकाऱ्यांचे गंभीर आरोप
पुणे: सिंहगड रस्त्यालगत असलेल्या नऱ्हे गावातील सार्थक नेताजी भगत(वय 20) या तरुणाच्या मृत्यू प्रकरणात अत्यंत धक्कादायक गोष्टी समोर येत असून याबाबत मनसेचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते यांनी खळबळजनक आरोप केले आहेत. मयत सार्थक हा खडकवासला मनसे पदाधिकाऱ्यांचा नातेवाईक असल्याने त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केल्यानंतर दडपण्याच्या मार्गावर असलेल्या घटनेला वाचा फुटली आहे.
मनसेचे खडकवासला विधानसभा अध्यक्ष विजय मते यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ ला दिलेल्या माहितीनुसार ’25 नोव्हेंबर रोजी सकाळी सार्थकवर पेट्रोल चोरीचा खोटा आरोप करत भाजपाचा पदाधिकारी तथा नऱ्हे गावचा माजी उपसरपंच सुशांत कुटे व इतर आरोपींनी अमानुष मारहाण केली त्यात उपचारांदरम्यान सार्थकचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर भाजपाचे खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार तब्बल पाऊण तास आरोपींना वाचविण्यासाठी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये ठाण मांडून होते. तसेच थेट केंद्रीय मंत्र्यांनी या प्रकरणात आरोपीचे नाव वगळण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. धक्कादायक म्हणजे तपास पथकाच्या एका अधिकाऱ्याने या कामासाठी वीस लाखांची मागणी केली.’
विजय मते यांनी पुढे सांगितले की आम्ही सर्व मनसेचे पदाधिकारी सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये गेलो व या प्रकरणी कोणालाही न वाचविता कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जर आरोपी असलेल्या भाजपा पदाधिकाऱ्याला वाचविण्याचा प्रयत्न झाला तर रस्त्यावर उतरून आंदोलन करु असा इशारा दिला. मनसेने कठोर भूमिका घेतल्यानंतर दडपण्याच्या मार्गावर असलेल्या प्रकरणात संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच भाजपाकडून सत्तेचा गैरवापर करण्यात येत असल्याचा आरोपही विजय मते यांनी केला आहे.
तो अधिकारी कोण? पोलीस आयुक्त त्या अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार?
या प्रकरणात तपास पथकातील एक अधिकारी मध्यस्थी करत असल्याचा व त्याने संबंधित आरोपीला वाचविण्यासाठी तब्बल वीस लाखांची मागणी केल्याचा आरोप विजय मते यांनी केला आहे. या प्रकरणी पुणे पोलीस आयुक्तांनी मात्र दबावाला बळी न पडता अत्यंत कठोर भूमिका घेतली. त्यामुळे जो पोलीस अधिकारी मांडवली करण्याचा प्रयत्न करत होता त्यावर पोलीस आयुक्त काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.