पेट्रोल चोरीच्या संशयातून बेदम मारहाणीमुळे तरुणाचा मृत्यू; तिघे अटकेत तर नऱ्हे गावचा माजी उपसरपंच फरार
पुणे: पेट्रोल चोरीच्या संशयातून करण्यात आलेल्या बेदम मारहाणीमुळे नऱ्हे येथे तरुणाचा उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सार्थक नेताजी भगत (वय 20, रा. व्यंकटेश्वरा सोसायटी, नऱ्हे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून याप्रकरणी गौरव संजय कुटे (वय 24), अजिंक्य चंद्रकांत गांडले(वय 20) व राहुल सोमनाथ लोहार(वय 23, सर्व राहणार नऱ्हे) यांना अटक करण्यात आली आहे तर चौथे आरोपी नऱ्हे गावचे माजी उपसरपंच सुशांत सुरेश कुटे हे फरार झाले असून सिंहगड रोड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
दि. 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सार्थक च्या दुचाकीचे पेट्रोल संपल्याने तो सुशांत कुटे यांच्या कार्यालयासमोर उभ्या असलेल्या एका दुचाकीतील पेट्रोल काढत होता. आरोपींनी त्याला पाहिले असता पकडून लाथाबुक्क्यांनी,काठीने, चैनने अत्यंत बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत सार्थकला जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र दुर्दैवाने उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला.
सार्थकच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींच्या विरोधात पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सिंहगड रोड पोलिस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(2), 115(2), 352, 3(5) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर फरार उपसरपंच सुशांत सुरेश कुटे यांचा पोलीस शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राघवेंद्र क्षिरसागर व गुन्हे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अक्षय पाटील हे याबाबत अधिक तपास करत आहेत.