Murder Incident:हत्येचे सत्र थांबेना…..भरदिवसा कोयत्याने वार… जखमीचा मृत्यू; पोलीस अधीक्षक साहेब आता तरी हवेली पोलीस स्टेशनला योग्य पोलीस निरीक्षक द्या!
Murder Incident:हत्येचे सत्र थांबेना…..भरदिवसा कोयत्याने वार… जखमीचा मृत्यू; पोलीस अधीक्षक साहेब आता तरी हवेली पोलीस स्टेशनला योग्य पोलीस निरीक्षक द्या!
खडकवासला: पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस स्टेशन हद्दीत सातत्याने गंभीर गुन्हे घडत आहेत. नुकतीच व्यावसायिक विठ्ठल पोळेकर यांच्या अपहरण आणि निर्घृण हत्येची घटना ताजी असतानाच आज पुन्हा कोल्हेवाडी, खडकवासला येथे भर दिवसा एकाची कोयत्याने वार करुन हत्या करण्यात आली आहे. सतीश थोपटे ( वय अंदाजे 40 रा. कोल्हेवाडी खडकवासला) असे मृताचे नाव असून हल्लेखोर पसार झाले आहेत.
आज सायंकाळी चार ते साडेचार वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडी येथील सतीश थोपटे राहत असलेल्या वसाहतीच्या परिसरात अज्ञात चार हल्लेखोरांनी हातात कोयते घेऊन पाठलाग करत त्यांची निर्घृण हत्या केली आहे. भर दिवसा गजबजलेल्या परिसरात ही घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. गंभीर जखमी झालेल्या सतीश थोपटे यांना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हल्ला कोणी व का केला याबाबत अधिकृत माहिती समोर आली नसून हल्ल्याची संपूर्ण घटना सोसायटीच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
पोलीस अधिक्षक साहेब हवेली पोलीस स्टेशनला योग्य पोलीस निरीक्षक द्या!
हवेली पोलीस स्टेशन हद्दीत मागील काही दिवसांपासून सातत्याने अत्यंत गंभीर गुन्हेगारी घटना घडत आहेत. नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून सध्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे हे गुन्हेगारी घटना रोखण्यात सपशेल अपयशी ठरत आहेत. त्यांचा गुन्हेगारांवर कोणताही वचक नाही. याउलट सर्वसामान्य नागरिकांना पोलीस निरीक्षक त्रास देत असून त्यांच्या विरोधात अनेक तक्रारींची जंत्री आहे. हवेली पोलीस स्टेशन हद्दीत अक्षरशः बिहार सारखे अराजक असल्याचे दिसत आहे. नागरिकांना सुरक्षित वाटेल असे कृत्य हवेली पोलीस स्टेशन कडून होताना दिसत नाही. मोठमोठ्या चोरीच्या घटना घडत असताना चोरांचाही शोध लागत नाही. त्यामुळे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी अधिक वेळ न लावता अशा निष्क्रिय, कुचकामी आणि अपयशी पोलीस निरीक्षकांचे ओझे हवेली पोलीस स्टेशन हद्दीतील नागरिकांच्या डोक्यावरुन उतरवून येथे योग्य पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.