Lampi Epidemic:पश्चिम हवेलीत पुन्हा ‘लंपि’ चा प्रादुर्भाव; दुग्धव्यवसायिक, शेतकऱ्यांपुढे संकट; खबरदारी घेण्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन
पश्चिम हवेलीत पुन्हा ‘लंपि’ चा प्रादुर्भाव; दुग्धव्यवसायिक, शेतकऱ्यांपुढे संकट; खबरदारी घेण्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे आवाहन
(निलेश बोरुडे: संपादक- द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस)
सिंहगड: पश्चिम हवेलीतील खानापूरसह परिसरातील गावांमध्ये पुन्हा लंपि आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने पशुधनाला धोका निर्माण झाला आहे. वेगाने लंपि आजाराचा संसर्ग वाढत असल्याने दुग्ध व्यावसायिक, शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी विष्णू गर्जे यांनी लंपि आजारापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
खानापूर येथील गिर जातीच्या जनावरांना लंपि चा संसर्ग झाला आहे. तसेच परिसरातील इतर शेतकऱ्यांच्या जनावरांनाही लंपि चा संसर्ग झाला आहे. लंपि हा संसर्गजन्य आजार असल्याने त्याचा वेगाने प्रसार होत असून परिणामी पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
” ज्या जनावरांना लंपि चा संसर्ग झाला आहे त्यांच्यावर पशुवैद्यकीय डॉक्टरांकडून तातडीने औषधोपचार सुरू करावेत. लंपि चा संसर्ग झालेली जनावरे इतर जनावरांपासून लांब ठेवावीत. चारा, पाण्याची व्यवस्था वेगळी ठेवावी. तसेच लंपि प्रतिबंधक लस टोचून घ्यावी”, असे आवाहन जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ विष्णू गर्जे यांनी केले आहे. तसेच पशुसंवर्धन विभागाकडून तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती डॉ विष्णू गर्जे यांनी दिली आहे.