राजरोसपणे गावठी कट्टे, कोयते, तलवारी घेऊन गुन्हेगार हैदोस घालत असताना ‘गोपनीय अंमलदार’ झोपा काढताहेत की खेपा वाहताहेत? हवेली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढल्याने उपस्थित केला जातोय प्रश्न!
राजरोसपणे गावठी कट्टे, कोयते, तलवारी घेऊन गुन्हेगार हैदोस घालत असताना ‘गोपनीय अंमलदार’ झोपा काढताहेत की खेपा वाहताहेत? हवेली पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हेगारी वाढल्याने उपस्थित केला जातोय प्रश्न!
सिंहगड:एका बाजूला मोठ्या प्रमाणात सुरू असलेले अवैध धंदे तर दुसऱ्या बाजूला खून, खुनाचा प्रयत्न, चोऱ्या, घरफोड्या आणि गावठी कट्टे, कोयते, तलवारी घेऊन सुरू असले गुन्हेगारांचा हैदोस अशी भयाण परिस्थिती हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सध्या दिसून येत आहे. हे सगळं होत असताना पोलिसांकडून मात्र कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना होताना दिसत नाहीत. त्यामुळे हवेली पोलीस ठाण्यातील गोपनीय अंमलदार झोपा काढताहेत की खेपा वाहताहेत? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी व सर्वसामान्य नागरिकांना सुरक्षित जीवन जगता यावे म्हणून हद्दीतील समाजकंटक, गुन्हेगार, अवैध धंदेवाले यांची इत्यंभूत माहिती आपल्या कौशल्याने काढून एखादा गंभीर गुन्हा घडण्याच्या अगोदर त्याची माहिती वरिष्ठांना देऊन त्याबाबत उपाययोजना करुन, प्रतिबंधक कारवाया करुन आवश्यक कार्यवाही करण्यासाठी ‘गोपनीय अंमलदार’ नियुक्त करण्यात आलेले असतात. ही जबाबदारी ज्या अंमलदाराकडे असते त्याने हद्दीत आपले स्वतःचे स्रोत निर्माण करुन गोपनीय माहिती संकलित करणे आवश्यक असते. त्यासाठी त्या अंमलदाराने सतत नागरिकांच्या संपर्कात राहून, त्यांना विश्वासात घेऊन अनौपचारिक चर्चा करत राहणे गरजेचे असते.
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र असं काही घडताना दिसत नाही दिसताहेत ते फक्त गंभीर गुन्हे, गुन्हेगार आणि अवैध धंदे! मग प्रश्न असा उपस्थित होत आहे की गोपनीय अंमलदार कार्यक्षम नाही? गोपनीय अंमलदाराने माहितीचे स्रोत निर्माण केले नाहीत? गोपनीय अंमलदारावर नागरिकांचा विश्वास नाही? गोपनीय अंमलदार झोपा काढत आहे? की कशाच्या खेपा वाहत आहे? जर अशीच परिस्थिती राहिली तर हवेली पोलीस स्टेशनच्या हद्दीत गुन्ह्यांचे प्रमाण असेच वाढत राहिल आणि पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्याच्या अब्रुची लक्तरं अशीच वेशीवर टांगत राहतील!