किरकटवाडी येथील स्टार सिटी प्रकल्पातील लेबर कॅंपचे मैलामिश्रीत सांडपाणी उघड्यावर सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका; समर्थ विहार सोसायटीतील रहिवासी हैराण; महापालिकेने कारवाई करण्याची मागणी
किरकटवाडी: येथील स्टार सिटी प्रकल्पातील लेबर कॅंपचे मैलामिश्रीत सांडपाणी राजरोसपणे उघड्यावर सोडण्यात येत असल्याने परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या प्रकल्पाला लागून असलेल्या समर्थ विहार सोसायटीतील रहिवासी या सांडपाण्याच्या दुर्गंधीमुळे हैराण झाले आहेत. याबाबत महापालिकेने तातडीने दखल घेऊन संबंधितांना आवश्यक उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत व कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
मागील अनेक दिवसांपासून स्टार सिटी येथील लेबर कॅम्प मधील तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या स्वच्छता गृहांतील मैलामिश्रीत पाणी व इतर सांडपाणी उघड्यावर सोडण्यात आलेले आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून डासांचा उपद्रव वाढला आहे. लेबर कॅम्प मोठा असल्याने अहोरात्र याठिकाणी सांडपाणी वाहताना दिसत आहे.
नागरिकांनी याबाबत स्टार सिटी येथील संबंधितांना सांगून हे पाणी थांबवावे अशी विनंती केली मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्यामुळे आता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून संबंधितांना सूचना द्याव्यात व कारवाई करण्यात यावी अशी मागणी समर्थ विहार सोसायटीतील रहिवासी व आजूबाजूचे जागामालक करत आहेत.