खडकवासला विधानसभा मतदारसंघातील शाळा-कॉलेजमध्ये उद्यापासून संवाद-समुपदेशन अभियान; खडकवासला येथील अत्याचार पिडीत मुलीची भेट घेतल्यानंतर महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची माहिती
पुणे: खडकवासला येथील पाचवीत शिकणाऱ्या मुलीवर 68 वर्षीय विकृत नराधमाने खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नुकतीच घडली आहे. पिडीत मुलीवर औंध येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान आज राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पिडीत मुलीची भेट घेऊन पालक व रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली.
भेटीनंतर रुपाली चाकणकर यांनी, “पुण्यातील खडकवासलामध्ये अल्पवयीन मुलीला खाऊचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची घटना काल घडली .आज औंध जिल्हा रूग्णालयात पिडित मुलगी व पालकांची भेट घेतली.जि म बा च्या उपस्थितीत पोलिसांच्या माध्यमातून समुपदेशन व तपासासाठी करावयाच्या आरोग्य तपासणी आज सकाळी झालेल्या आहेत. आरोपी अटकेत असून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.लवकरात लवकर दोषारोपपत्र सादर करून आरोपीवर कडक कारवाई केली जाईल ,आयोगाच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत,” अशी माहिती समाज माध्यमातून दिली आहे.
तसेच याबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ शी बोलताना चाकणकर यांनी सांगितले की,”खडकवासला येथील पिडीत मुलीला न्याय देण्यासाठी मी वैयक्तिक लक्ष घालून पाठपुरावा करत आहे. उद्यापासून खडकवासला विधानसभा मतदारसंघातील सर्व शाळा- कॉलेजमध्ये पोलीस, समुपदेशक, राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शुभांगी खिरीड यांच्यासह समुपदेशन, संवाद व माहिती यासंदर्भात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत.”
त्या तक्रारीची दखल घेणार का?
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला व मुलींच्या संदर्भाततील गुन्ह्यांची संख्या लक्षणीय असताना निर्भया पथकाची गाडी पोलीस निरीक्षक स्वतःसाठी वापरत असल्याबाबत महिला आयोग व पोलीस अधीक्षकांकडे 15 फेब्रुवारी 2024 रोजी लेखी तक्रार करण्यात आलेली आहे. निर्भया पथकाचे काम प्रभावीपणे सुरू असते तर खडकवासला येथील दुर्दैवी घटना घडली नसती. आरोपी शाळेच्या परिसरात सातत्याने घिरट्या घालत असायचा याची माहिती मुलींनी निर्भया पथकाला दिली असती, परंतु तसे झाले नाही. खडकवासला येथील घटनेतून याचा गंभीर परिणाम समोर आला आहे. संबंधित तक्रारीबाबतही रुपाली चाकणकर यांच्याकडे विचारणा करण्यात आली असता नोंद घेतली असल्याचे सांगण्यात आले.