निर्भया पथकाची गाडी हवेलीच्या पोलीस निरीक्षकांनी ढोपरली….. दुर्दैवाने ‘ती भीती’ खरी ठरली; खडकवासला येथे चिमुकलीवर अत्याचार झाल्याने प्रश्न ऐरणीवर
खडकवासला: हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकवासला येथे अवघ्या दहा वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे मात्र महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी असलेले ‘निर्भया पथक’ आणि त्या निर्भया पथकाचे सरकारी वाहन याबाबत फेब्रुवारी महिन्यात ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने मांडलेले वास्तव व व्यक्त केलेली भीती दुर्दैवाने खरी ठरली आहे. आतातरी वरिष्ठ अधिकारी याबाबत दखल घेणार का की आणखी अत्याचार होण्याची वाट पाहणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हवेली पोलीस ठाण्यातील निर्भया पथकासाठी स्कॉर्पिओ गाडी होती. सध्याच्या पोलीस निरीक्षकांच्या ती काळ्या काचा असलेली स्कॉर्पिओ मनात भरली आणि पदभार स्विकारल्यानंतर त्यांचा भार याच स्कॉर्पिओवर पडला. पूर्णवेळ निर्भया पथकाची ही स्कॉर्पिओ पोलीस निरीक्षकांच्या दिमतीला होती. परिणामी निर्भया पथकाला महिला व मुलींच्या सुरक्षिततेसाठी गस्त घालणे, भेटी देणे वगैरे कामांसाठी ही गाडी उपलब्ध नसायची.
हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिला व मुलींच्या संदर्भाततील गुन्हे सातत्याने घडत असताना निर्भया पथकाची गाडी पोलीस निरीक्षक वापरत असल्याबाबत ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने वरिष्ठ पोलीस अधिकारी व महिला आयोगाचेही लक्ष वेधले होते. तसेच याबाबत लेखी तक्रार देखील करण्यात आली होती. दुर्दैवाने त्या तक्रारीत व्यक्त करण्यात आलेली भीती खरी ठरली. अशा दुर्दैवी घटना आणखी घडण्याची वाट न पाहता आता तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत दखल घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. पोलीस ठाण्यातील व परिसरातील वर्षभराचे सीसीटीव्ही फुटेज जतन करून ठेवणे बंधनकारक असल्याने निर्भया पथकाची स्कॉर्पिओ पोलीस निरीक्षक वापरत होते की नाही याचे पुरावे अजूनही उपलब्ध आहेत. त्याची पडताळणी करुन कारवाई होणे आवश्यक आहे.