खडकवासला येथे दहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; 68 वर्षीय विकृत आरोपी अटकेत; शिक्षकांनी विश्वासात घेतल्यानंतर मुलीने सांगितला धक्कादायक प्रकार
खडकवासला: दहा वर्षांच्या मुलीवर एका विकृत नराधमाकडून खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना खडकवासला येथे घडली आहे. याप्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून दिलीप नामदेव मते (वय 68, रा. खडकवासला) याला अटक करण्यात आली आहे.
मुलींच्या सुरक्षिततेसाठी तक्रारी समजून घेण्यासाठी शाळेतील शिक्षिकांनी मुलींना बाजूला घेऊन विश्वासात घेऊन विचारणा केली असता एका मुलीने आपल्या बाबतीत घडलेली धक्कादायक घटना सांगितली. आरोपीने खाऊसाठी पैसे देण्याचे सांगून घरात नेऊन अत्याचार केल्याचे मुलीने सांगितले. शिक्षिका, मुख्याध्यापक यांनी तातडीने याबाबत पालक शिक्षक संघातील सदस्यांशी चर्चा केली व हवेली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला.
पालकांच्या तक्रारीवरून सदर घटनेबाबत हवेली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोप दिलीप नामदेव मते यास अटक करण्यात आली आहे. हवेली पोलीस पुढील तपास करत आहेत.
आरोपी विकृत मानसिकतेचा….
आरोपी दिलीप मते हा विकृत मानसिकतेचा असून तो सातत्याने मुलींना छेडण्याचे प्रकार करत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे. काही दिवसांपूर्वी खडकवासला येथील नागरिकांनी आरोपीला समज दिली होती परंतु त्याच्यात सुधारणा झाली नाही.
शाळेच्या परिसरात आरोपीचा वावर….
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार आरोपी सातत्याने शाळेच्या परिसरात फिरत असायचा व मुलींना खाऊचे आमिष दाखवून सलगी करण्याचा प्रयत्न करायचा.