काळ आला होता पण…… पीएमआरडीएच्या अग्निशमन दलाच्या जवानांमुळे दोन तरुणांना जीवदान; मुठा नदी पात्रात दोन तास ‘रेस्क्यु ऑपरेशन’ चा थरार
खडकवासला: सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुठा नदीच्या पाण्यात नांदेड-शिवणे पुलाजवळ दोन तरुण अडकल्याची माहिती मिळताच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे नांदेड सिटी अग्निशमन केंद्र व पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल होतात. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे 19 हजार क्युसेकने विसर्ग सुरू असल्याने पाण्याचा वेगवान प्रवाह सुरू असतो. पाण्याने वेढलेले दोन्ही तरुण मातीच्या ढीगाऱ्यावर उभं राहून जीवाच्या आकांताने मदतीसाठी मोठमोठ्याने याचना करत असतात. नदीच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात बघ्यांची गर्दी जमलेली असते.
मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जवानांची टीम तयार करतात. मोटर बोट, रोप लॉंचर, लाईफ जॅकेट असे सर्व साहित्य तयार ठेवण्यात आले. कोणत्या बाजूने बोट उतरवणे सुरक्षित व सोईस्कर होईल याची अग्निशमन अधिकारी सुजित पाटील यांनी स्वतः पाहणी केली.
अखेरीस मोटर बोट व रोपच्या सहाय्याने दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जवान त्या तरुणांजवळ पोचले व त्या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले. पाटबंधारे विभागानेही या बचावकार्यादरम्यान विसर्ग कमी करुन सहकार्य केले. प्रकाश अंबादास आंधळे (वय 20) व ऋषिकेश काशिनाथ थिटे (वय 20, दोघेही रा. दांगट पाटील नगर) अशी त्या बचावलेल्या तरुणांची नावे आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय अग्निशमन अधिकारी सुजित पाटील ,चालक अतुल रोकडे जवान श्रीकांत आढाव,विशाल घोडे,नितीन पवार,साईनाथ मिसाळ ,मंगेश साळुंखे ,प्रतीक शिरसाट व पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी ही कामगिरी केली.