धक्कादायक…….तारा चोरण्यासाठी टॉवरवर चढणं बेतलं जीवावर; साथीदारांनी मृतदेह ठेवला दुर्गम ठिकाणी पुरुन; तब्बल पंचवीस दिवसांनी सापडला मृतदेह
वेल्हे: वेल्हे तालुक्यातील दुर्गम पाबे घाटात धक्कादायक घटना उघडकीस आली असून महावितरणच्या तारा चोरण्यासाठी टॉवरवर चढलेल्या तरुणाचा पडून मृत्यू झाला होता. चोरीसाठी सोबत असलेल्या साथीदारांनी तरुणाचा मृतदेह पाबे घाटातील अतिदुर्गम ठिकाणी पुरुन टाकला होता. तब्बल पंचवीस दिवसांनी हा मृतदेह शोधण्यात पुणे शहर, ग्रामीण पोलीस व हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमला यश आले आहे. बसवराज पुरंत मॅंगिनमनी (वय 22, रा. जाधवनगर, वडगाव बुद्रुक,पुणे) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
बसवराज 10 जुलै 2024 पासून बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात दिली होती. सिंहगड रोड पोलिसांनी तांत्रिक तपास केल्यानंतर बसवराजचे शेवटचे लोकेशन वेल्हे तालुक्यातील पाबे घाटाच्या परिसरात आले होते. त्यावेळी बसवराज च्या सोबत इतर काही साथिदार असल्याची माहितीही पुणे पोलिसांना मिळाली.
बसवराजच्या सोबत असलेल्या साथिदारांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी सर्व हकीकत सांगितली. बसवराज चा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी मृतदेह पाबे घाटातील अतिदुर्गम ठिकाणी पुरुला असल्याचे सांगितल्यानंतर पोलीस व आपत्ती व्यवस्थापन टीमचे सहकारी कसून शोध घेत होते. अखेर सिंहगड रोड पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक निकेतन निंबाळकर, इतर पोलीस कर्मचारी, हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमचे गुलाब भोंडेकर , संदीप सोळसकर,गणेश सपकाळ,संजय चोरगे, दिलीप तळेकर,अनिल रेणुसे, तानाजी भोसले यांना काल रात्री उशिरा मृतदेह पुरलेले ठिकाण सापडले. दोरखंडाच्या सहाय्याने उतरुन डोंगर कपारीत खड्डा खोदून पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. सिंहगड रोड पोलिस पुढील तपास करत आहेत.
‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ने वेधले होते लक्ष!
आरोपींनी मृतदेह पाबे घाटात पुरलेला असल्याची कबुली दिलेली असताना सिंहगड रोड पोलिस शोध घेण्यासाठी योग्य सहकार्य करत नसल्याची तक्रार बसवराज चे नातेवाईक सुरेश गोटुर यांनी ‘द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’कडे काल दुपारच्या सुमारास केली होती. तातडीने याबाबत पुणे शहर पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कळविल्यानंतर पुणे शहर पोलीस आवश्यक कार्यवाही करत असल्याबाबत द इन्व्हेस्टीगेशन एक्स्प्रेस’ला सांगण्यात आले होते. अखेर काल रात्री उशिरा मृतदेह शोधण्यात पोलिसांना यश आले.