हिंगोलीच्या भिंगी गावात ‘नाम’ आणि BASF च्या संयुक्त विद्यमाने पाच किलोमीटर नदीचे खोलीकरण; लोकार्पणासाठी कंपनीचे MD आले थेट जर्मनी वरुन
हिंगोली: महाराष्ट्रातील दुष्काळी व अवर्षणग्रस्त भागांमध्ये जलसंधारणाचे काम करुन नाम फाऊंडेशनने गाळाने भरलेले ओढे, पाझर तलाव, नद्या, धरणे यांना नवसंजीवनी दिली आहे. नाम फाऊंडेशनने मागील काही वर्षांपासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ही मोहीम हाती घेतली असून या कामासाठी दानशूर व्यक्ती, कंपन्यांचा सीएसआर फंड यांचा मोलाचा हातभार लागत आहे. नाम फाऊंडेशनचे गुणवत्तापूर्ण कार्य व पारदर्शकता यांमुळे दिवसेंदिवस कामाची व्याप्ती वाढत चालली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील भिंगी या गावात नाम फाऊंडेशन आणि BASF यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल पाच किलोमीटर लांबीचे नदी खोलीकरण करण्यात आले. या कामामुळे मोठा जलसाठा निर्माण झाला असून परिसरातील शेकडो एकर शेती व पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांना या कामाचा फायदा होणार आहे. नुकतेच पूर्ण झालेल्या या कामाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी BASF या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर अलेक्झांडर गरडींग हे थेट जर्मनी वरुन खास आले होते.
परिसरातील नागरिकांनी नाम फाऊंडेशन चे पदाधिकारी, कर्मचारी व BASF या कंपनीचे अधिकारी, कर्मचारी यांचा मोठ्या उत्साहात सन्मान करुन कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी गिरीधर रनुवा ( बिझनेस डायरेक्टर BASF एग्रीकल्चरल सोल्युशन इंडिया), सोनल कुमार ( हेड ऑफ सेल्स BASF एग्रीकल्चरल सोल्युशन इंडिया ), मयूर डोंबे ( बिझनेस युनिट लीड BASF ॲग्रीकल्चर सोल्युशन इंडिया ) , तृप्ती कदम ( कंट्री डेव्हलपमेंट BASF इंडिया लिमिटेड ), इंद्रजीत देशमुख ( विश्वस्त नाम फाउंडेशन ), अमिता शेट्टी ( नाम फाउंडेशन सल्लागार ), गणेश थोरात ( CEO नाम फाउंडेशन ), सुरेश आगलावे ( सरपंच भिंगी ) आणि उपसरपंच ,ग्रामस्थ आदी उपस्थित होते.