बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याबाबतची भूमिका बदलली नाही; माजी मंत्री विजय शिवतारे यांचे बंडाचे निशान आणखी उंच!
पुणे: ‘आपण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूकीतून माघार घेतल्याची बातमी काही माध्यमांनी दाखवली असून ती पूर्णतः खोटी आहे. मी मतदार संघातील जनतेसोबत चर्चा करुन मगच निर्णय जाहीर करणार असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून सांगितले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्पष्ट सांगतो मी माघार घेतलेली नाही’ असे म्हणत माजी मंत्री विजय शिवतारे यांनी आपले बंडाचे निशान आणखी उंच केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत विजय शिवतारे कसे निवडून येतात तेच बघतो! असे जाहीर वक्तव्य अजित पवार यांनी केले होते. दरम्यान तो पराभव विजय शिवतारे यांच्या खुप जिव्हारी लागल्याचा प्रत्यय काही दिवसांपूर्वी आला होता. आता बदला घेण्याची वेळ आली आहे असे म्हणत शिवतारे यांनी बारामती लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली. विजय शिवतारे यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी मोठे आव्हान असणार असल्याच्या चर्चांना उधाण आले.
महायुतीत असलेल्या शिवसेनेच्या विजय शिवतारे यांच्या भूमिकेमुळे ‘सर्वकाही आलबेल नाही’ हे स्पष्टपणे दिसून आले. वातावरण ढवळून निघाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारे यांना वर्षा निवासस्थानी बोलवून घेऊन समज दिल्याचे सांगण्यात आले मात्र तरीही आपण भूमिका बदलली नसल्याचे विजय शिवतारे यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केल्याने हा तिढा आणखी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
खरच निवडणूक लढविणार की ‘उपद्रव मुल्याचा आढावा’?
पवार विरुद्ध सुळे अर्थात पवार विरुद्ध पवार अशी बारामती लोकसभा मतदारसंघाची थेट लढत रंगणार असल्याच्या चर्चा जोर धरत असताना त्यात अचानक विजय शिवतारे यांची एंट्री झाल्याने यामागील तर्क शोधले जात आहेत. विजय शिवतारे खरंच लोकसभा निवडणूक लढविणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आपले उपद्रव मूल्य दाखवून पुढे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘शब्द घेणार’ असाही अंदाज बांधला जात आहे. दरम्यान घोडा मैदान आता जास्त दूर नसल्याने सध्या सुरू असलेल्या चर्चा या चर्चाच राहतात की त्याप्रमाणे घडते हे लवकरच स्पष्ट होणार आहे.