Murder & Suicide:दुसऱ्या पत्नीला सतत जीवे मारण्याची धमकी; शेवटी पत्नीची दगडाने ठेचून हत्या करुन पतीचीही गळफास घेऊन आत्महत्या; एनडीए-बहुली रस्त्यावरील पिकॉक बे परिसरातील धक्कादायक घटना
पुणे: ‘तुला केवळ मुलांना जन्म देण्यासाठी आणले होते आता तू मुलांना ठेवून माहेरी निघून जा नाहीतर तुला मारुन टाकीन’ अशी दुसऱ्या पत्नीला सातत्याने धमकी देणाऱ्या पतीने तिची दगडाने ठेचून हत्या करुन स्वतःही जवळच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. खडकवासला धरणालगत एनडीए-बहुली रस्त्यावरील पिकॉक बे परिसरात काल दि. 25 फेब्रुवारी रोजी ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सुवर्णा सोमनाथ वाघ(वय अंदाजे 40, रा. परांजपे अभिरुची परिसर धायरी) आणि सोमनाथ सखाराम वाघ(वय 52, रा. आदित्य गार्डन सिटी, वारजे माळवाडी) अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत.
मृत सुवर्णा वाघ यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार सोमनाथ वाघ हे दुसरी पत्नी व मुलीच्या सांगण्यावरून सुवर्णाला नेहमी मारहाण करत होते. माहेरी निघून जा नाहीतर तुला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी देत होते. काल सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सोमनाथ वाघ याने पत्नी सुवर्णा हीस फिरायला जाऊ असे सांगून पिकॉक बे परिसरात नेले. दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून ते दोघे घनदाट झाडीत गेले. तेथे सोमनाथ याने पत्नी सुवर्णा हिचा दगडाने ठेचून खून केला व जवळच्या झाडाला पॅंटने गळफास घेऊन स्वतःही आत्महत्या केली.
नातेवाईक शोध घेत असताना रस्त्याच्या कडेला दुचाकी दिसल्याने जंगलात जाऊन पाहिले असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याबाबत तातडीने उत्तमनगर पोलीसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली झोन तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम, गुन्हे शाखेचे उपायुक्त अमोल झेंडे, पोलीस निरीक्षक युसुफ शेख, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमृता चवरे व इतर अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. याप्रकरणी मयत सोमनाथ वाघ यांच्यासह त्यांची दुसरी पत्नी व मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक युसुफ शेख याबाबत अधिक तपास करत आहेत.